मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळावे 

मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळणे आवश्यक आहे. शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही, तर त्याचे गमक हे गुंतवणूक करूनच कळू शकते. अगदी छोटय़ा रकमेपासूनही गुंतवणूक करता येते. तरुण वयातच गुंतवणुकीची शिस्त लावून घेणे सुरक्षित भविष्यासाठी गरजेचे आहे.

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय आहे.  जमीन खरेदीतील गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. पण कर्ज काढून घेतलेली स्थावर मालमत्ता गुंतवणूक म्हणून चांगली नाही. बँकेत ठेवी ठेवताना आपण चलनवाढीचा विचार करत नाही. गुंतवणुकीवर चलनवाढीचा परिणाम होणार नसेल, तरच ती गुंतवणूक चांगली समजावी. सोन्याच्या दागिन्यांमधील घट आदी गोष्टी जमेस धरल्या, तर दागिने हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय नाही. शेअर बाजाराचा चांगला अभ्यास करून त्यात पैसे गुंतवता येतील. मात्र कोणत्याही एकाच प्रकारची गुंतवणूक करण्यापेक्षा वेगवेगळ्या स्वरूपातील विभाजीत गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे.
आजपासून साधारण वीस वर्षांनंतर आपला आर्थिक स्तर आहे तो राखण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. ती करताना महागाईचा दर, आपल्या जबाबदाऱ्या, योजना, धोका पत्करण्याची क्षमता या सगळ्याचा विचार हवा. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक हा दीर्घकालीन फायदा देणारा आणि सुरक्षित पर्याय आहे. नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारून अगदी कमी रकमेपासूनही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येऊ शकते. विद्यार्थिदशेपासूनच गुंतवणुकीची सवय पुढील काळात चांगले लाभ देऊ शकते.

आपण हिशेब लिहितो पण स्वत:च्या आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद मांडत नाही. काही वर्षांपूर्वी जी गुंतवणूक केली त्याचे आताचे मूल्य काय हे आपण लक्षात घेत नाही. असे मूल्यमापन करण्याची सवय लावून घेतल्यास कोणत्याही वित्तीय सल्लागाराशिवाय देखील तुम्ही आपल्या गुंतवणुकीची बाजारातील किंमत काय ते काढू शकाल. आपण आधी केलेली गुंतवणूक किती बरोबर होती किंवा ती कुठे चुकली हे यातून कळेल. वैयक्तिक गुंतवणुकीत पुढच्या पाच वर्षांसाठीचे धोरण हवे.

Leave a comment